‘वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धना’ बाबत जिंती गाव ‘दिशादर्शक’ ठरेल : तहसीलदार अभिजित जाधव

फलटण : हवामानातील होत असलेले बदल व वाढते तापमान अशा गंभीर परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. राज्यात व देशभरात सर्वत्र तापमान वाढीची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हा प्रभावी उपाय आहे. सह्याद्री देवराई उपक्रमांतर्गत जिंती ता. फलटण येथे मोठ्या प्रमाणात होत असलेला वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य असून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाबाबत जिंती गाव सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी व्यक्त केला.
जिंती ता. फलटण येथे ‘सह्याद्री देवराई’ च्या माध्यमातून ‘ग्रीन जिंती प्रोजेक्ट २०२६’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियानाचा शुभारंभ तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. विजय रणवरे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, युवराज पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तापमान वाढीमुळे आपणा सर्वांना वृक्ष लागवडीचे व झाडांचे महत्त्व लक्षात आले आहे. झाडांमुळे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते व पावसाचे प्रमाणही वाढते परंतु वृक्षारोपण करण्याबरोबरच त्यांचे संगोपन होणे देखील तितकेच महत्वपूर्ण आहे असे निदर्शनास आणून देत वृक्षारोपणाचा उपक्रम हा केवळ वन विभाग व प्रशासन यांच्या पातळीवरच सीमित न राहता त्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग असायला हवा जर असे झाले तर आपला गाव व तालुका पर्यावरण संवर्धनामध्ये निश्चितपणे अग्रेसर राहील असा विश्वास तहसीलदार अभिजीत जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
वृक्षारोपण व देवराई निर्माण करण्याचा उपक्रम स्वच्छ व सुंदर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे असे उपक्रम गावोगावी राबविण्यास प्राधान्य मिळायला हवे. आज रस्ते मोठ्या प्रमाणात विकसित होत असले तरी त्या बाजूची वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वर्षांपूर्वीची जुनी झाडे उकडून टाकण्यात येत आहेत, ही उघडलेली झाडे पुन्हा लागत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने होत असलेली वृक्षतोड ही मोठी शोकांतिका आहे असे स्पष्ट करून डॉ प्रसाद जोशी म्हणाले, काहीजण नक्षत्र बन ही संकल्पना प्रभावीपणे राबवीत आहेत. या संकल्पनेत प्रत्येक राशीनुसार एक नक्षत्राचे झाड लावण्यात येते. जर आपण या झाडाच्या सानिध्यात बसलो अथवा वेळ घालवला तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर, आरोग्यावर व मनावर होतो हे सिद्ध झाले आहे, आणि या नक्षत्रांच्या झाडांमध्ये वर्ड पिंपळ करंज अर्जुन चंदन आवळा जांभूळ अशा विविध देशी झाडांचा समावेश आहे.
प्रशांत रणवरे यांचे निमंत्रण सयाजी शिंदे यांचा होकार..!
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नुकतेच वृक्ष लागवडीच्या निमित्ताने फलटण तालुक्यात आले होते त्यावेळी पत्रकार प्रशांत रणवरे यांनी त्यांची भेट घेऊन जिंती येथे ग्रामस्थ लोकवर्गणीतून सह्याद्री देवराई चा उपक्रम राबविणार असल्याची माहिती देत हा उपक्रम कशा पद्धतीने राबवणार याचे माहिती वजा प्रात्यक्षिक शिंदे यांना दाखविले व जिंती येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. सयाजी शिंदे यांना हा उपक्रम आवडला व त्यांनी त्याला मान्यताही दिली तुम्ही उपक्रम सुरू करा आगामी काळात या उपक्रमासाठी आपण स्वतः जिंती येथे निश्चितपणे येऊ असे त्यांनी कबूल केले असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते विविध प्रकारच्या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिंती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!