
फलटण : पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव जगताप यांनी शैक्षणिक, राजकीय, व्यवसाय, सामाजिक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाने निश्चितपणे एक वेगळा ठसा उमटविला आहे. संवाद, संघटन व संपर्काचे कौशल्य ही एक कला आहे, आणि ती यांच्या कडे चांगल्या प्रकारे आहे. काम, पक्ष व नेतृत्व याकरिता त्यांच्यासारखा प्रामाणिक, एकनिष्ठ व हरहुन्नरी कार्यकर्ता व व्यक्तिमत्व कुठे शोधूनही मिळणार नाही असे उदगार शिवसेना नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.
साप्ताहिक रामआदेशचे संपादक बापूराव जगताप यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात, ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दीपकराव चव्हाण, पंचायत समितीचे उप सभापती अमोल सस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, शिवसेना तालुका प्रमुख नानासो इवरे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पोपटराव मिंड यांची उपस्थिती होती.
बापूराव जगताप यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात, फलटण पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात, ॲम्ब्युलन्स सेवा व अन्य उपक्रमांद्वारे सामाजिक क्षेत्रात व आता साप्ताहिक रामआदेश द्वारे पत्रकारिता क्षेत्रात ते कार्यरत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला असून बापूराव जगताप हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही असे स्पष्ट करून संजीवराजे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात डिजिटल बदल होत आहेत ते बदल आत्मसात करून बापूराव मोठ्या आत्मविश्वासाने वृत्तपत्र क्षेत्रात सातत्यपूर्व व जिद्दीने काम करताना दिसून येत आहेत. या वाटचालीमध्ये त्यांचे चिरंजीव शेखर जगताप यांची त्यांना महत्वाची साथ मिळत आहे. अनेक बातम्या या काही कारणासाठी येत असतात परंतु बापूराव जगताप यांची कुठलीही बातमी ही कोणत्याही कारणासाठी आलेली नाही हे आपण ठाम पणे सांगू शकतो, सकारात्मक पत्रकारितेवर त्यांचा कायम भर राहिला आहे, वेगळ्या उद्देशापासुन ते नेहमीच दूर राहिले आहेत त्यामुळे त्यांचे निश्चितपणे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे बोलून संजीवराजे म्हणाले, त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच चांगले सहकार्य लाभले आहे. त्यांच्या रूपाने एक मोठा व दिलदार माणूस नक्कीच आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या सहासष्टीचा मोठा कार्यक्रम आपण सर्वजण मिळून नक्की आयोजित करू असेही संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

बापूराव जगताप संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व…
बापूराव जगताप म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीतून संघर्षाला सामोरे जात घडलेले नेतृत्व होय. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच चांगले योगदान दिले. पक्ष, गट-तट यांचा विचार न करता सर्वांशी हसत खेळत मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. चांगल्या नेतृत्वाच्या सानिध्यात आले की एक चांगला माणूस कसा तयार होतो याचे उत्तम उदाहरण आपणास बापूराव जगताप यांच्या माध्यमातून पहायला मिळेल.
मा. आ. दीपकराव चव्हाण, फलटण
बापूराव जगताप यांना यथोचित संधी मिळावी…
बापूराव जगताप यांनी आपल्या सेवेच्या काळात आणि त्यानंतरही सतत राजघराण्यावरील निष्ठा जपत केलेल्या कामाची नोंद घेऊन त्यांना पंचायत समितीमध्ये सदस्य पद दिले गेले तथापि त्यानंतरही त्यांचा लोकसंग्रह आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांना विधानसभेची किमान जिल्हा परिषद सदस्य पदाची संधी देणे आवश्यक होते, तथापि राजकीय समीकरणे जुळविताना ते घडले नसले तरी आता विविध शासकीय समित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील तेव्हा त्यामध्ये बापूराव जगताप यांना योग्य संधी देण्यात यावी.
अरविंद मेहता, जेष्ठ पत्रकार, फलटण
कार्यक्रमात संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते बापूराव जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात आल्यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार पोपट मिंड यांचाही वाढदिवसा निमित्त मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मान्यवरांचे स्वागत व सत्कार शेखर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन राजकुमार गोफणे यांनी केले. आभार नानासो इवरे यांनी मानले. यावेळी विविध साप्ताहिकांचे संपादक, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.

