
फलटण : फलटण तालुक्यात यंदाच्या हंगामात ऊस लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून एकूण क्षेत्र १६ हजार ७४६ हेक्टरवरून २१ हजार २४० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. मात्र, हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे हेक्टरी उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने वाढलेल्या क्षेत्राचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना मिळेल का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच गाळपासाठी उपलब्ध कारखान्यांची क्षमता आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या संभाव्य अनिश्चिततेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
यंदाच्या लागवड क्षेत्राचा आढावा घेतल्यास खोडवा ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे २ हजार ३७२ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७ हजार ८५ हेक्टरवर खोडव्याचे पीक आहे. दुसरीकडे, गळीत हंगाम अधिक काळ चालावा या उद्देशाने आडसाली लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले असले तरी अपेक्षित ८ हजार ५२९ हेक्टरच्या तुलनेत केवळ ६ हजार ४४ हेक्टरवरच आडसाली लागवड झाली आहे. पूर्व हंगामी ऊसाचे क्षेत्रही वाढले असून सर्वसाधारण ३ हजार ९६१ हेक्टरच्या तुलनेत यंदा ५ हजार ४०३ हेक्टरवर लागवड झाली आहे. तसेच सुरू ऊसाचे क्षेत्र १ हजार ८८४ हेक्टरवरून वाढून २ हजार ७०८ हेक्टरवर पोहोचले आहे.
मात्र, गेल्या वर्षी अचानक पडलेली तीव्र थंडी आणि त्यानंतर वाढलेली प्रचंड उष्णता यामुळे ऊसाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे यंदा ऊसाचे वजन कमी होण्याची शक्यता असून हेक्टरी उत्पादन ७५ ते १०० मेट्रिक टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, ऊस उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना त्यानुसार दर मिळत नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, साखरेलाही उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याची भूमिका साखर कारखानदारांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणांनी साखर कारखानदार, ऊस उत्पादकांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीत साखरेचे दर आणि ऊसाच्या एसएमपीमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त असून, याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. असा निर्णय झाल्यास शेतकरी आणि साखर उद्योग या दोघांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यात यंदा २१ हजार २४० हेक्टरवरील ऊस गाळपासाठी तयार असून अंदाजे १६ ते २० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, श्रीराम सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. उर्वरित तीन खासगी साखर कारखाने तसेच लगतचे सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखाने हा संपूर्ण ऊस वेळेत गाळप करू शकतील का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात विक्रमी वाढ झाली असली तरी उत्पादनातील संभाव्य घट, गाळप व्यवस्थेवरील ताण आणि दरवाढीची प्रतीक्षा या तिहेरी आव्हानांमुळे फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागून राहिले आहे.

