तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार ; विविध योजनांची माहिती एकाच छताखाली

फलटण : तृतीयपंथीयांना संविधानाने बहाल केलेले समान हक्क प्रत्यक्षात मिळावेत आणि त्यांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच सामाजिक सुरक्षेचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राजपथ येथील अलंकार हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय तृतीयपंथीय व्यक्ती सक्षमीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच तृतीयपंथीय समाजातील मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शिबिरात उभारण्यात आलेल्या माहिती स्टॉलचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शासनाच्या योजना तृतीयपंथीयांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तींवरील अत्याचार, भेदभाव रोखण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी आणि तक्रार निवारण यंत्रणेबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी ‘तृतीयपंथीय धोरण-२०२४’ आणि केंद्र शासनाच्या २०१९ च्या अधिनियमाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
शिबिरात जिल्हा पुरवठा कार्यालय, कौशल्य विकास व रोजगार विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कामगार कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या स्टॉलद्वारे शिधापत्रिका, ई-श्रम कार्ड, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, कायदेशीर हक्क तसेच विविध कर्ज व कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष अधिकारी श्रुती रकटे, सुवर्णा साळवे, विकास गायकवाड, मनीषा सावंत तसेच समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!