
फलटण : फलटण-बारामती महामार्गावरील सोमंथळी येथे प्रवासी बस थांबा तातडीने बांधून द्यावा, तसेच बस थांब्याच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नियमाधीन गतिरोधक उभारावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले असून १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास सोमंथळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे.
फलटण-बारामती मार्गावर सोमंथळी हे मोठ्या वसाहतीचे गाव असून गावातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी यांना एसटी बसची प्रतीक्षा करताना उन्हात व पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. बस थांब्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या ठिकाणी अपघाताचा धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सोमंथळी गावासाठी बस थांबा उभारण्याची जबाबदारी संबंधित हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची असल्याचे सांगत, याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींना यापूर्वी लेखी व तोंडी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
सोमंथळी गावाची लोकसंख्या मोठी असून दररोज पाचशेहून अधिक प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतात, त्यामुळे सुरक्षित व सुविधायुक्त बस थांबा ही या गावासाठी अत्यावश्यक गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
१५ ऑगस्टपूर्वी बस स्टॉपचे काम पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा स्वातंत्र्य दिनी सकाळी ११ वाजता सोमंथळी बस थांब्याच्या ठिकाणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन करण्याची इच्छा नसून, न्याय्य मागण्यांकडे प्रशासन व संबंधित कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष विक्रम पवार, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे यांच्यासह बाळासाहेब शिपुकले, बापूराव फरांदे, अशोक खलाटे, कांतीलाल अहिवळे, जगन्नाथ अहिवळे, अविनाश पोकळे, प्रल्हाद अहिवळे आणि आनंद आहिवळे आदींच्या सह्या आहेत.

