
फलटण : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फलटणचा ‘श्रीराम’ कारखाना बंदच पाडायचा आहे का?” असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील सहकारी कारखाने अडचणीत असताना सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.
फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीराम कारखाना बंद पडल्याचा थेट फटका हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे हा केवळ एका सहकारी संस्थेचा प्रश्न नसून फलटण तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे स्पष्ट करून बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्याऐवजी खासगी साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले जात आहे का, असा सवालही शेट्टी यांनी सरकारला केला. श्रीराम कारखाना अडचणीत असताना शासनाने ठोस भूमिका जाहीर करून आवश्यक आर्थिक व प्रशासकीय मदत करावी, अशी मागणी करतानाच श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करून शासनाने शेतकरी हिताचा विचार करून कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक मदत न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही शेट्टी यांनी या वेळी दिला.
राजू शेट्टीना शेतकऱ्यांचे साकडे, माढा लोकसभा लढवा…
फलटण दौऱ्यात राजू शेट्टी यांना भेटण्यासाठी फलटण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भेटण्यास आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तालुक्यातील कारखानदारीची अवस्था व देण्यात येणारा दर या विषयीची पारिस्थिती त्यांच्या समोर मांडली. यावेळी शेट्टी यांनी श्रीराम हा शेतकऱ्यांचा असून तो बंद पाडून देणार नाही व उसाला चांगला दर देखील शेतकऱ्यांना मिळवून देणार असे अश्वस्त केले. त्याच बरोबर चालू उसाला जाहीर केलेल्या ३४०० रुपयांत आणखी ३०० रुपये प्रति टन वाढवून द्यावेत अशी मागणी शेट्टी यांनी केली. यावेळी अगामी २०२९ ची लोकसभा निवडणूक राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदार संघातून लढवावी त्या निवडणुकीचा खर्च शेतकरी करतील अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गाने केल, तेव्हा त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ अशी हमी शेट्टी यांनी दिली.
राजकीय संघर्षाची ठिणगी पुन्हा पेटली..!
श्रीराम कारखान्याच्या प्रश्नावरून आमदार रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात यापूर्वीपासूनच जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कारखाना आर्थिक अडचणीत जाण्यामागची कारणे, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना आणि त्यासाठीची जबाबदारी यावरून फलटणमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच राजू शेट्टी यांनी सरकारच्या भूमिकेवर व थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधल्याने हा संघर्ष आता आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

