
फलटण : गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव असून, त्याचे रूपांतर कर्णकर्कश डीजेच्या स्पर्धेत होऊ देणार नाही. फलटण तालुक्यात गणेशोत्सव काळात होणाऱ्या डी.जे.च्या बेकायदेशीर व आरोग्यास घातक वापरावर पूर्णतः बंदी घालावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे फलटण तालुका अध्यक्ष वैभव जगताप यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम यांची जागा मोठ्या क्षमतेच्या डीजे साउंड सिस्टीमने घेतली आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा जगताप यांनी निवेदनात केला आहे. ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हृदयरोगी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला तसेच रुग्णांना त्रास होतो, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. गणेशोत्सवाच्या नावाखाली अश्लील गाणी व बीभत्स नृत्यप्रकारांना प्रोत्साहन मिळत असल्याने सणाचे पावित्र्यही बाधित होत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. तसेच डीजे सोबत वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईटमुळे डोळे व आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. हा प्रश्न केवळ ध्वनी प्रदूषणाचा नसून नागरिकांच्या आरोग्याने आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
फलटण तालुक्यात गणेशोत्सव काळात डीजेवर संपूर्ण बंदी जाहीर करावी, पारंपरिक ढोल-ताशा वादनाला सशर्त परवानगी द्यावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करून मंडपाची परवानगी रद्द करावी, डीजे सिस्टीम जप्त करावी आणि रात्री १० नंतरच्या ध्वनिक्षेपक बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या ग्राहक पंचायतीने केल्या आहेत.
येत्या ४८ तासांत प्रशासनाने या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन लेखी आदेश जारी केला नाही, तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. गरज भासल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही वैभव जगताप यांनी दिला आहे.
“गणपती बाप्पाला आरती, भजन आणि ढोल-ताशांचा गजर प्रिय आहे; डीजेचा धांगडधिंगा नाही. मंडळांच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करावा. डीजेमुक्त गणेशोत्सव हाच खरा पर्यावरणपूरक आणि भक्तिमय गणेशोत्सव ठरेल,” असे जगताप यांनी सांगितले.
या निवेदनावर वैभव जगताप, उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सचिव मारुती मोहिते, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष आप्पासाहेब पिसाळ, जिल्हा सदस्य सदाशिव मोहिते यांच्यासह फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देण्यात आले आहे.
याचिका दाखल करण्याची वेळ येऊ देऊ नका…
पुणे जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यात प्रशासनाकडून कुचराई झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. अशी परिस्थिती सातारा जिल्ह्यात निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

