
फलटण : फलटण पूर्व भागातील राजुरी ते मुंजवडी या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली असून खड्ड्यात हरवलेला हा रस्ता व रस्त्याच्या साईडपट्ट्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. खडतर अवस्था होऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागा बाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर या रस्त्यावर अपघात घडून जिवीत हानी व कोणी गंभीर जखमी झाले तर त्यास संबंधित विभाग व त्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे अशी मागणी या परिसरातून व्यक्त होत आहे.
राजुरी ते मुंजवडी रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. खडतर अवस्थेतील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता अखेरची घटका मोजत आहे. राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी या मार्गाचाही वापर केला जातो. तसेच हा मार्ग आळंदी-पुणे-फलटण-पंढरपूर या पालखी महामार्गा लगत असल्याने, या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. ऊस गळीत हंगामात उस वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे या रस्त्यावर नेहमी वाहतूकीची मोठी कोंडी होते. खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसह खड्ड्यांकडे बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे काय ?असा सवाल या परीसरातून व्यक्त होत आहे. या परिसरातील कथीत गाव पुढाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून दुरूस्तीसाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षाही नागरीक व्यक्त करत आहेत.
